Sunday, 16 April 2017

शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page -3}





शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page -3}


--::     शिवाजींचा पवाडा    ::--


जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास ।
चाकरी ठेवी लोकांस ॥

थाप  देऊन हाती  घेई चाकण किल्ल्यास ।
मुख्य केले फिरंगोजीस ॥

थोडया  लोकाांसहीत  छापा घाली सुप्यास ।
कैद पाहा केलें मामास ॥

सुप्या सोबत  हाती घेतले  तीनशें  घोड्यास ।
करामत  केली रात्रीस ॥

मूसलमानां  लांच देई घेई कोंडाण्यास ।
सिंहगड नांव दिले त्यास ॥

पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास ।
कैद पाहा केलें सर्वांस ॥

गांव इनाम देऊन सर्वा ठेवी चाकरीस ।
मारलें नाही कोणास ॥

वाटेमधी छापा घालून लूटी खजीन्यास ।
सांठवी राजगडास ॥

राजमांची  लोहगड़ी  लढे घेई तिकोण्यास ।
बाकी चार किल्ल्याांस ॥

मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायस ।
धूर्त  योजी फितुरास ॥

सन्मान कैद्या देई पाठवि  वीजापुरास ।
मुलान्या सुभेदारास ॥

विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास ।
योजना केली कपटास ॥

करनाटकी  पत्र पाठवी बाजी घोरपड्यास ।
कैद तूम्ही करा शहाजीस ॥

भोजनाचें निमित्य  केलें नेलें भोसल्यास ।
दग्यानें कैद केलें त्यास ॥

थेट  शहाजी कैदी आणिला वीजापूरास ।
खशी मग झाली यवनास ॥

चिरेबांदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास ।
ठेविलें भोक वाऱ्यास ॥

शाहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस ।
ऎकून भ्याला बातमीस ॥

पिताभक्ति  मनिं  लागला शरण जायास ।
विचारी आपल्या श्रीयेस ॥

साजे नाांव सईबाई स्त्री सुचवी पतीस ।
ताडा दंडी दूसमानास ॥

स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिले पत्रास ।
पाठवी दिल्ली मोगलास ॥

चाकर झालों तूमचा आता येतों चाकरीस ।
सोडवा माझ्या पित्यास ॥

मोगल थैली गेली थेट  मुसलमानास ।
ठेविले किल्ल्यावर त्यास ॥

बाजी शामराज कां  लाजला जात सांगायास ।
धरुं पाही शिवाजीस ॥

धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास ।
अडचण झाली बखरीस ॥

सिध्दिस बेत गेला नाहीं  आंती  भ्याला जिवास ।
काळें केलें महाडास ॥

शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस ।
हा पाजी मूकला जितीस ॥

करनाटकीं आज्ञा झाली शहाजीस ।
यवन भ्याला सिंहास ॥

वषें चार झालीं शिवला नाहीं कबजास ।
पितभक्ति पुत्रास ॥

चंद्रराव मोरयास मारी घेई जावळीस ।
दुसरे वासोटय़ा किल्ल्यास ॥

प्रतापगड बांधी पेशवा केला एकास ।
नवे योजी हुद्यास ॥

आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास ।
चलाखी दावी मोंगलास ॥

रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास ।
पाठवि गडी लुटीस ॥

आडमार्ग करी हळूच गेला नगरास ।
लुटी हत्तीघोड्यांस ॥

उंच वस्त्रें, रत्नं होन कमती नाहीं द्रव्यास ।
चाकरी ठेवि बारगिरांस ॥

समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस ।
चाकरी ठेवि पठाणास ॥

सिद्धि  पेशव्या आपेक्षा देई घई यशास ।
उदासी लाभ शिवाजीस ॥

आबजूलखान शूर  पठाण आला वांईस ।
शोभला मोठा फौजेस ॥

हत्ती  बारा हजार घोडा त्याचे दिमतीस ।
कमी नाहीं दारूगोळीस ॥

कारकुनाला वचनीं दीलें हिंवरें बक्षीस ।
फितिवले लोभी ब्राह्मणांस ॥

गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास ।
चुकला नाहीं संकेतास ॥

माते पायीं डोई ठेवी लपवी हत्यारास ।
बरोबर आला बेतास ॥

समीप येता शिवाजी जसा भ्याला व्यार्घास ।
कमी करी आपल्या चालीस ॥

गोपीनाथ सुचना देई भोळया यवनास ।
भ्याला तुमच्या शिपायांस ॥

त्या अधमाचें ऎकन शिपाई केला बाजूस ।
लागला भेटूं शिवाजीस ॥

वर भेटभाव वाघनख मारीं पोटास ।
भयभित केलें पठाणास ॥

पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस ।
झोंबती एकमेकांस ॥

हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस ।
पठाण मुकला प्राणास ॥

स्वामीभक्त धाव घेई कळले शिपायास ।
राहिला उभा लढण्यास ॥

त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास ।
तान्हाजी भिडे बाजूस ॥

दांती  दाढी चावी तोंडी घेई धनी सूडास ।
घाबरें केलें दोघांस ॥

नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस ।
लाथाळी जीवदानास ॥

तान्हाजिला हूल देई मारी हात शिवाजीस ।
न्याहाळी प्रेंति  धण्यास ॥

उभयतांसी  लढता  मुकला आपल्या प्राणास ।
गेला जन्नत  स्वर्गास ॥

छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस ।
पठाणपुत्र  खाशा स्त्रियेस  ॥

चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास ।
दुसऱ्या सरांजामास ॥

अलांकार वस्त्रें देई सर्व  कैदी जखम्यांस ।
पाठवि विजापूरास ॥

वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस ।
फ़ितूऱ्यास  गोपीनाथास ॥

नाचत गात सर्व गेले प्रतापगडास ।
उपमा नाहीं आनंदास ॥


                        ॥ चाल ॥

॥ शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥

॥ क्षेत्र्याचा मेळा मावळयाचा शिकार खेळला ॥

माते पायीं ठेवी डोई गर्व  नाहीं काडीचा ।
आशिर्वाद  घेई आईचा ॥

आलाबला घेई आवडता  होता जिजाचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥ ३ ॥

*              *                *              *


To be Continued ........................ 







No comments:

Post a Comment