Saturday, 11 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 7}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 7}

         म्हणून त्यांस पाणी जर आहे, तर सर्वच गोष्टी आहेत आणि पाणी जर त्यांस शेतकीचे कामापुरतें नाही तर ते सर्वच गोष्टीस मुकतात. कारण त्यांस एक पाणी जा अनुकूल आहे, तर जमीन कशीही खरपड, पडीक, मुरमाड असली तरी ते तिजमध्ये उत्पन्न करू शकतील. फार काय सांगावे एक पाण्याच्या साह्याने त्या तसल्या मूरमाड जमिनीवर जीं जीं धान्येतो हंगाम नसताना उत्पन्न करतां येतील. त्याचें लहानसे उदाहरण पहा कीं, 'आऊंदा' जवळ ज्या जमिनीवर हल्ली आपलेम गव्हर्नसाहेबांचा बंगला आहे, ती जमीन आपणास थोडक्याच दिवसांपूर्वी अतिशय मुरमाड असल्यामुळे कोणत्याहि प्रकारचे पीक येण्यास अगदी नालायक असें वाटत होतें. परंतू तिच्यावरच हल्ली फळवृक्ष, पुष्पवृक्ष आणि दुसरे नानाप्रकार वृक्ष व वनस्पती यांच्या योगाने एक सुदंर मनोहर बाग होऊन गेला आहे. त्यासारखा बाग चांगले मशागत केलेले काळेभोर जमिनीवर देखील पुणे मुक्कामी सांपडणे विरळा.
          अशा वाईट जमिनीवर आस उत्तम बाग होणे हे मोठे आश्चर्य होय.परंतू थोडासा विचार करून पाहिलें असता त्याचे मुख्य कारण त्या जमिनीवर नदीपासून पाण्याचा नळ आणून जिकडे तिकडे पाणीच पाणी सोडले आहे.याशिवाय मनुष्याचे श्रम वगैरे ही कारणे आहेत खरी; परंतु ती मुख्य आहेत असे म्हणता येत नाहीं . त्यांत पाणीच मुख्य कारण असे समजले पाहिजे. याजकरिता शेतकरी लोकांस शेतकीच्या कामास पाणी असणें ही मूख्य गोष्ट आहे.
        ते असें समजतात की, त्यांस पाणी जर आहे, जर तेच त्यांचे सर्व धन व एश्वर्य आहे. त्याचमध्येच त्यांच्या सर्व सोयी व ऐषआरामाच्या गोष्टीं आहेत. कारण त्यांस जर एकाच साली पाण्यानें आपलें हातचें सोडिलें कीं त्यांचे सर्व सौख्य जाते, संपत्ती जाते, आणि मुलांबाळासह व दुसरी कुटुंबांतील माणसें त्यासह मोठे विपत्तीत पडतात. कित्येकांना आपला देशत्याग करावा लागतो. कित्येक अन्नाकरितांत्राही त्राही होऊनलोकांच्या घरोघर, दारोदार ( भीक मागू ) लागतात. कित्येक आपले प्राणत्यागासही प्रवृत्त होतात. आतां या गोष्टी कोणते रीतीनेंघडून आल्या व हल्ली येत आहेत याविषयी लिहिणें अवश्य वाटल्यावरून थोडेसें लिहितों.



No comments:

Post a Comment